Page Nav

HIDE

Classic Header

{fbt_classic_header}

Top Ad

Breaking

latest

भर उन्हात वाहतूक पोलिसांची चलान वसुली; अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष?

दत्त चौकात ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास; शहरातील वाहतुकीवर नेमका वचक कोणाचा? यवतमाळ | प्रतिनिधी राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना...


दत्त चौकात ज्येष्ठ नागरिक व महिलांना त्रास; शहरातील वाहतुकीवर नेमका वचक कोणाचा?

यवतमाळ | प्रतिनिधी

राज्यात उष्णतेची तीव्र लाट सुरू असताना यवतमाळ शहरातील गजबजलेल्या दत्त चौक परिसरात वाहतूक पोलिसांकडून भर दुपारी वाहनचालकांवर चलान कारवाईचा सपाटा सुरू असल्याची तीव्र नाराजी नागरिकांमधून व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, शहरात खुलेआम सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीकडे दुर्लक्ष होत असताना सर्वसामान्य नागरिकांवर मात्र कारवाई केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक असून नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई होणे अपेक्षित आहे. मात्र शहरात विनापरवाना सुरू असलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीच्या ठिकाणी कठोर कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसरीकडे दत्त चौक परिसरात अल्प वेळेसाठी वाहन उभे करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक, महिला आणि वैद्यकीय किंवा शैक्षणिक कामासाठी आलेल्या नागरिकांना भर उन्हात चलन दिले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.

नागरिकांच्या म्हणण्यानुसार, दत्त चौक परिसरात पार्किंगची पुरेशी व्यवस्था नसल्याने औषधे घेण्यासाठी किंवा तातडीच्या कामासाठी दोन-तीन मिनिटे वाहन उभे केले तरी त्वरित चलन केले जाते. काही ठिकाणी वाहतूक पोलीस रस्त्यावर न उभा राहता दुकानांच्या आडोशाला थांबून वाहनांवर कारवाई करत असल्याचाही आरोप होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत आहे.

दरम्यान, शहराच्या चारही दिशांना — अमरावती, अकोला, नागपूर, चंद्रपूर, धामणगाव आणि पांढरकवडा मार्गांवर अवैध प्रवासी वाहतुकीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरलेले दिसून येत आहे. लहान वाहनांपासून मोठ्या ट्रॅव्हल्सपर्यंत अनेक गाड्या नियमांचे उल्लंघन करून सर्रास प्रवासी वाहतूक करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या हाकेच्या अंतरावरूनही या गाड्यांची वाहतूक सुरू असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.

अवैध प्रवासी वाहतुकीमुळे शहरात वाहतूक कोंडी वाढत असून नागरिकांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला आहे. नियमांचे पालन न करता भरधाव वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनावर प्रश्न

गेल्या काही वर्षांत यवतमाळ जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची चर्चा वारंवार होत आहे. नुकतेच खासदार यांनी लोकसभेत यवतमाळमधील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. अशा परिस्थितीत शहरातील अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत असल्याची टीका होत आहे.

सामाजिक संघटना आक्रमक होण्याची शक्यता

वाहतूक शाखेकडून काही भागांत कारवाई होत असली तरी शहरातील इतर महत्त्वाच्या भागांमध्ये वाहतूक व्यवस्थेचा पूर्णतः बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. सभ्य नागरिकांवर कारवाई आणि अवैध वाहतुकीकडे दुर्लक्ष, या दुहेरी भूमिकेमुळे नागरिकांमध्ये रोष वाढत आहे.

जर ज्येष्ठ नागरिक, महिला आणि सर्वसामान्य वाहनधारकांना विनाकारण त्रास देण्याचे प्रकार थांबले नाहीत, तर शहरातील विविध सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून आंदोलन छेडतील, अशी प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाकडे पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.

No comments