यवतमाळ | प्रतिनिधी जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्त...
यवतमाळ | प्रतिनिधी
जिल्ह्याच्या सामाजिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रात गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यासाठी सावित्री ज्योतिराव समाजकार्य महाविद्यालय व सुमती शिक्षण संस्थेच्या वतीने दरवर्षी पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याच परंपरेनुसार यंदाही विविध क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये प्रख्यात सर्जन तथा ‘प्रयास यवतमाळ’चे अध्यक्ष डॉ. विजय कावलकर यांना सुमन रमेश तुलसीयानी मानवसेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी रामटेके तसेच आंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू व प्रशिक्षक मनीषा आकरे यांना (साधना बंडेवार पुरस्कृत) सावित्रीबाई फुले प्रेरणा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच सायनशिया मल्टीपरपज सोसायटीच्या वतीने अमृता खंडेराव यांच्या हस्ते सामाजिक कार्यकर्त्या वैशाली हिरे यांना प्रोत्साहन पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण समारंभाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा. अनंत अत्रावलकर होते. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे, हिरालाल भांगे, प्रा. डॉ. रमाकांत कोलते, सौ. सुमती कोलते आदी मान्यवर उपस्थित होते.
सत्काराला उत्तर देताना डॉ. विजय कावलकर म्हणाले की, “या सन्मानामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली असून भविष्यात अधिक जोमाने काम करून आपल्या सहकार्याने यवतमाळचे सामाजिक विश्व अधिक पुढे नेऊ.” पुरस्कार स्वीकारताना प्रमोदिनी रामटेके, मनीषा आकरे व वैशाली हिरे यांनीही पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, या सन्मानामुळे आपल्या कार्यक्षेत्रात अधिक काम करण्याची ऊर्जा मिळाल्याचे सांगितले.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना ज्येष्ठ पत्रकार दिनेश गंधे यांनी सत्कारमूर्तींच्या कार्याचे कौतुक करत त्यांच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व उपस्थितांना प्रभावी शब्दांत विशद केले. “पुरस्कारप्राप्त मान्यवरांनी आपल्या कार्यातून निर्माण केलेला आदर्श विद्यार्थ्यांनी पुढे न्यावा,” असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रा. डॉ. रमाकांत कोलते व हिरालाल भांगे यांनीही समायोचित मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय मनोगतात प्रा. अनंत अत्रावलकर यांनी पुरस्कारप्राप्त सर्व मान्यवरांचे अभिनंदन करत, “आपल्या गौरवामुळे संस्थेचे नाव मोठे झाले असून आपल्या कार्यामुळे समाज अधिक समृद्ध झाला आहे,” असे नमूद केले.
कार्यक्रमाचे निवेदन प्रा. डॉ. कमल राठोड यांनी केले, प्रास्ताविक प्रा. घनश्याम दरणे यांनी तर आभार प्रा. डॉ. सीमा शेटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रवी टेकाडे, शेखर कोलते, प्रा. कल्पना राऊत, अभय कोलते, सौ. आंबेकर, संजय तोडकरी, सुनीता, शीतल मोरे तसेच विद्यार्थी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाला आनंद योग प्राणायाम मंडळाचे सर्व सदस्य, प्रयास यवतमाळचे कार्यकर्ते, शहरातील गणमान्य नागरिक व मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
No comments