पब्लिक पोस्ट । रजतकुमार खाडे उमरखेड / महागांव : महागांव तालुक्यातील मोरथ येथे घडलेली घटना ही केवळ हल्ला नसून महागांव पोलिस स्टेश...
पब्लिक पोस्ट ।
रजतकुमार खाडे
उमरखेड / महागांव : महागांव तालुक्यातील मोरथ येथे घडलेली घटना ही केवळ हल्ला नसून महागांव पोलिस स्टेशनच्या हद्दीमधिल कायदा - सुव्यवस्थेवर रेती माफियांनी केलेली थेट चढाई आहे. कर्तव्य बजावत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनिल अंभोरे यांच्यावर रेती चोरट्यांनी जीव घेण्याच्या उद्देशाने केलेला हल्ला म्हणजे पोलीस प्रशासनाला उघड उघड दिलेले आव्हान आहे. रेतीच्या बेकायदेशीर वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अंभोरे हे गुरुवारी (ता.18) रोजी सकाळी दहा वाजताच्या सुमारास घडली. महागांव तालुक्यातील सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अंभोरे हे मोरथ परिसरात गेले असता, रेती माफियांनी आधीच तयारीत असल्याप्रमाणे ट्रॅक्टर अडवण्यास विरोध केला. काही क्षणांतच पाच ते सात जणांचा टोळका जमा झाला आणि सिमेंटचे जड झाकण उचलून सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यावर फेकत, बेदम मारहाण करत त्यांचा जिव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परिस्थिती अत्यंत गंभीर बनल्याने आणि स्वतःचा जीव धोक्यात आल्याचे स्पष्ट होताच, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अंभोरे यांनी हवेत दोन गोळ्या झाडल्या. मात्र गोळीबारानंतरही आरोपी थांबले नाहीत, उलट सहाय्यक पोलीस अधिकाऱ्यावर हल्ला सुरूच ठेवत त्यांनी आपली गुन्हेगारी मानसिकता उघड केली.
या अमानुष हल्ल्यात सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनिल अंभोरे यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. पोलीस अधिकाऱ्याला जखमी करून, सरकारी कामात अडथळा आणून आणि थेट हत्या करण्याचा प्रयत्न करूनही आरोपी ट्रॅक्टरसह फरार होतात, ही बाब अत्यंत धक्कादायक आणि लाजिरवाणी आहे. यावरून महागांव तालुक्यात रेती माफियांचे जाळे किती बळकट आहे, हे स्पष्ट होते.
या घटनेनंतर दंगल नियंत्रण पथक दाखल झाले असले तरी हल्लेखोर मोकाट असल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत असून,
“पोलीस सुरक्षित नाहीत, तर सामान्य नागरिकांचे काय?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. या प्रकरणात खुनाचा प्रयत्न, सरकारी कामात अडथळा, दंगल, शस्त्रास्त्र कायदा आणि मोक्का अंतर्गत कठोर कारवाई करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे. फक्त इशारे नव्हे, तर बुलडोझर कारवाई व माफियांचे नेटवर्क उद्ध्वस्त करण्याची ठोस कृती झाली नाही, तर कायद्याची उरलेली पतही संपुष्टात येईल, असा इशारा नागरिक व सामाजिक संघटनांकडून दिला जात आहे.
.....चौकट....
पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट !
घटनेची गंभीरता लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी स्वतः मोरथ येथील घटनास्थळी भेट दिली. त्यांनी हल्ला झालेल्या ठिकाणाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. तसेच जखमी एपीआय अंभोरे यांच्या तब्येतीची विचारपूस करून तपासाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
आरोपींना तातडीने अटक करून रेती माफियांविरोधात कठोर कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
No comments