नेर (प्रतिनिधी) आज डॉ. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, वटफळी येथे तालुका विधी सेवा समिती, नेर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक मार...
नेर (प्रतिनिधी)
आज डॉ. आंबेडकर कनिष्ठ महाविद्यालय, वटफळी येथे तालुका विधी सेवा समिती, नेर यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर या उपयुक्त आणि जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. समाजातील विविध घटकांना कायद्याबाबत सजग करण्याच्या उद्देशाने आयोजित केलेल्या या शिबिरात विद्यार्थ्यांना विविध कायद्यांची माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात प्रा. अंभोरे सर यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जाण निर्माण करण्यामागील उद्देश स्पष्ट करत उपस्थित सर्वांचे स्वागत केले.
यानंतर अॅड. एस. बी. सांगळे यांनी विद्यार्थ्यांना महिलांशी संबंधित विविध कायदे, POCSO कायदा, तसेच महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा याविषयी सविस्तर माहिती दिली. कायदे जाणून घेणे आणि त्यांचा योग्य प्रकारे वापर करणे कसे महत्त्वाचे आहे यावर त्यांनी मुद्देसूद मार्गदर्शन केले.
त्यानंतर अॅड. आर. एस. हळदे यांनी मुलांचे मूलभूत हक्क या विषयावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना संविधानाने दिलेले अधिकार, त्यांचे संरक्षण आणि त्याची अंमलबजावणी याबद्दल उपयुक्त माहिती पुरवली.
पांगारकर मॅडम यांनी सर्वांसाठी शिक्षणाचा हक्क या महत्वाच्या विषयावर विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षणाचे संवैधानिक महत्त्व आणि प्रत्येकाने शिक्षणाचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी कसा करावा यावर मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री. जी. सी. फुलझाडे, दिवाणी न्यायाधीश, नेर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत कायद्याचे ज्ञान असणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. त्यांनी शिबिराच्या आयोजनाचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी कायदेविषयकदृष्ट्या सक्षम होतात असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे उत्तम सूत्रसंचालन प्रा. वैभव डब्बावार सर यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. अनिल वाघमारे सर, प्रा. सुनील ठोकाडे सर, प्रा. विनोद घोडेस्वार सर, प्रा. देवेंद्र राठोड सर, प्रा. स्नेहा मनवर मॅडम तसेच इतर शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेवटी प्राचार्य अनिल वाघमारे सर यांनी सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
No comments