निलेश भोयर झरी यावर्षी थंडीने उच्चांक गाठला असून ग्रामीण भागात तिचा तीव्र फटका बसत आहे. पहाटे व रात्री तापमान मोठ्या प्रमाणात घस...
निलेश भोयर
झरी
यावर्षी थंडीने उच्चांक गाठला असून ग्रामीण भागात तिचा तीव्र फटका बसत आहे. पहाटे व रात्री तापमान मोठ्या प्रमाणात घसरत असून घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दाट धुके, थंड वारे आणि वाढलेली थंडी यामुळे शेतकरी, शेतमजूर, वृद्ध व लहान मुलांचे हाल होत आहेत.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार यावर्षी थंडीचा प्रभाव जास्त राहणार असून पुढील काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. थंड उत्तरेकडील वाऱ्यांमुळे पहाटे गारठा वाढेल, तर काही भागांत दाट धुक्याचा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे सकाळच्या वेळी शेती कामकाज आणि ग्रामीण वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
शेतकऱ्यांना पहाटे शेतात जाणे अवघड होत असून पिकांवर दवबिंदूंचा मारा, तर भाजीपाला व फळबागांना नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. पशुपालकांकडून दुधउत्पादनात घट होत असल्याच्या तक्रारी येत आहेत.
थंडीपासून बचावासाठी गावोगावी शेकोट्या पेटवून नागरिक उब घेत आहेत. मात्र अनेक गरीब कुटुंबांकडे पुरेसे उबदार कपडे नसल्याने त्यांची अडचण अधिकच वाढली आहे. थंडी वाढल्याने सर्दी, खोकला, ताप, छातीत जडपणा व सांधेदुखीचे रुग्ण वाढत असल्याने ग्रामीण आरोग्य केंद्रांकडून दक्षता घेण्याची गरज आहे.
No comments