यवतमाळ: शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती (डीएन...
यवतमाळ:
शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे उप मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती (डीएनटी) समाजाच्या सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक आणि दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेत यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांची भटक्या, विमुक्त, जाती, जमातीचे 'राष्ट्रीय नेते' म्हणून निवड केली आहे. या महत्त्वपूर्ण निवडीनंतर यवतमाळ जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात डीएनटी प्रवर्गातील सर्व घटकांनी प्रचंड आनंद व्यक्त केला आहे.
आज शुक्रवारी मंत्री संजय राठोड यांच्या यवतमाळ येथील निवासस्थानी सर्व समाज घटकातील प्रतिनिधींनी एकत्र येत त्यांचा पारंपरिक पद्धतीने सत्कार केला. संजय राठोड यांच्या या निवडीने भटक्या, विमुक्त, बंजारा अशा सर्व समाज घटकांना राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत आवाज मिळाल्याची भावना यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी व्यक्त केली. तसेच या निवडीमुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांना न्याय मिळून या घटकांची सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
या सत्कार प्रसंगी प्रामुख्याने शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख हरीहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, यशवंत पवार, समन्वयक संजय हातगावकर, युवासेना जिल्हा प्रमुख प्रद्युम्न जवळकर, आदिवासी आघाडीचे सुरेश चिंचोळकर, संजय सल्लेवाड,सचिन महल्लेनिलेश बेलोकार यांच्यासह शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, हा निर्णय केवळ एका पदनियुक्तीपुरता मर्यादित नसून देशातील अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याच्या व्यापक दृष्टीकोनाचा भाग आहे. देशभरात विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे १० ते १२ कोटी असून एकट्या महाराष्ट्रात हा आकडा जवळपास १.५ कोटी इतका आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, जातप्रमाणपत्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधांपासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहे.
महाराष्ट्रातील डीएनटी प्रवर्गामध्ये बंजारा, लमाण, बेरड, रामोशी, भामटा, कंजारभाट, पारधी (फासे पारधी, टाकणकर व इतर उपगट), वडार, कैकाडी, राजपूत भामटा, गोसावी, नाथपंथी गोसावी, बेलदार, गारुडी, घिसाडी/गाडी लोहार, गोल्ला, गोंधळी, गोपाळ, जोशी, कोल्हाटी, डोंबारी, नंदीवाले, वैदू, वासुदेव, बहुरुपी, शिकलगार, सिकलीगर यांसह इतर अनेक समाजांचा समावेश होतो. या सर्व समाजांना एकत्रित नेतृत्व आणि एका सक्षम संघटनेची मोठी आवश्यकता होती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या समाजाच्या प्रश्नांची गंभीर दखल घेऊनच ही महत्त्वपूर्ण जबाबदारी मंत्री संजय राठोड यांच्यावर सोपविली आहे.
मंत्री संजय राठोड यांच्या नेतृत्वात आगामी काळात राज्य व देशभरातील डीएनटी समाजाचे संघटन अधिक मजबूत करण्यासाठी व्यापक अभियान राबविण्यात येणार आहे. प्रत्येक राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर संघटन उभे करणे, युवक, महिला आणि सुशिक्षित वर्गाला नेतृत्वात संधी देणे, तसेच शासन स्तरावरील प्रलंबित प्रश्नांसाठी प्रभावी पाठपुरावा करणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.
मंत्री संजय राठोड यांची निवड ही कोणत्याही एका विशिष्ट समाजापुरती मर्यादित नसून संपूर्ण विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाच्या अस्मिता, न्याय, सन्मान आणि उज्ज्वल भविष्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरेल. या निर्णयामुळे डीएनटी समाजामध्ये नवे नेतृत्व उभे राहून समाज अधिक संघटित आणि सक्षम होईल, असा ठाम विश्वास संपूर्ण राजकीय आणि सामाजिक स्तरातून व्यक्त केला जात आहे.
No comments