बाभूळगाव प्रतिनिधी :- गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने संपूर्ण तालुक्यातील परिसर जलमय झाला आहे. नद्या, नाले...
बाभूळगाव
प्रतिनिधी :-
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने संपूर्ण तालुक्यातील परिसर जलमय झाला आहे. नद्या, नाले दुथडी भरून वाहत असून, आज 9 जुलै रोजी गोंधळी गावाला पुराच्या पाण्याने विळखा घातला. मुसळधार पावसामुळे गावालगतची अंदाजे दोनशे एकर शेतजमीन पाण्याखाली गेली असून, शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोंधळी गावाच्या शेजारील किन्ही, विरखेड, वाटखेड, यरनगाव, सारफळी आदि गावाशी संपर्क पूर्णपणे खंडित झाला आहे. सद्यस्थितीत गावातील चहूबाजूंचा परिसर जलमय झाला असून स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.
7 जुलै रोजी हळुवार सुरु झालेल्या पावसाने काल रात्रीपासून जोर तीव्र केला आहे. संततधार बरसणाऱ्या पावसामुळे गोंधळी गावातील रस्ते आणि पूल पाण्याखाली गेले. गावकऱ्यांचे बाहेरील जगाशी असलेले संबंध तात्पुरते तुटले आहेत. परिस्थिती नियंत्रणात येण्यासाठी पाऊस थांबणे अत्यावश्यक आहे. पावसाचा जोर कमी झाल्यास आणि पाण्याचा निचरा झाल्यासच रस्ते पुन्हा वाहतुकीसाठी खुले होऊ शकतील. या संकटकाळात गावातील वृद्ध नागरिक आणि महिला मंदिरात जाऊन पावसाचा जोर कमी व्हावा आणि गावाचे नुकसान टळावे, यासाठी देवाची प्रार्थना करत आहेत. शेतकरी आपल्या उद्ध्वस्त झालेल्या पिकांकडे पाहून हवालदिल झाले असून, प्रशासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा करीत आहेत. स्थानिक प्रशासनाने परिस्थितीवर लक्ष ठेवले असून, पावसाचा जोर कमी झाल्यानंतर मदत कार्याला गती येई असे मत व्यक्त केले आहे.
पोलिस व महसूल प्रशासनाच्या नागरिकांना मार्गदर्शक सूचना
पूरस्थितीच्या भागात शक्यतो जाणे टाळावे, विजा चमकत असताना झाडाखाली न थांबता सुरक्षित स्थळी जावे, नदी, नाल्याच्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यास वाहने टाकू नये, जे रस्ते पुरामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत त्या ठिकाणी गाव समितीतील कर्मचारी, कोतवाल यांनी आवर्जून उपस्थित राहावे, हवामानाच्या अंदाजाची माहिती मिळविण्याकरिता ‘सचेत’ अॅपचा वापर करावा, पुराच्या पाण्यात, धरण क्षेत्रात किवा पर्यटनस्थळी जावून सेल्फी काढणे अथवा रील बनविणे सारखे प्रकार टाळावे, गावातील पूरपरिस्थितीबाबत नागरिकांनी तहसीलदार, पोलीस विभाग, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, महसूल सहायक आदींना तत्काळ माहिती द्यावी, जेणे करून प्रशासनाला लागलीच मदत पोहचवता येईल.
No comments