प्रा.न. मा. जोशी, यवतमाळ. ८८०५९४८९५१ अमरावतीच्या जवाहर गेटच्या आत मध्ये असलेल्या साबण पु-यातील रंगारी गल्लीत राहणाऱ्या...
प्रा.न. मा. जोशी, यवतमाळ.
८८०५९४८९५१
अमरावतीच्या जवाहर गेटच्या आत मध्ये असलेल्या साबण पु-यातील रंगारी गल्लीत राहणाऱ्या माझा भाचा विशाल सुरेखा यांनी दोन दिवसांपूर्वी दूरध्वनी वरून एक बातमी सांगितली आणि अक्षरशः नयनातून टप टप टप आसवे टपकायला लागली. कारण बातमीच अशी होती. रंगारी गल्लीतील तीन मजली शतकोत्तर इमारत जी सिकची धर्मशाळा म्हणून ओळखल्या जात होती तिचे आयुष्य संपल्याने महानगरपालिकेने नियमा नुसार विश्वस्तांच्या मान्यतेने जमीन दोस्त करून टाकली.
या घटनेने माझ्यासारख्या शेकडो लोकांच्या डोळ्यातून आसवे गळाली असतील
कारण ही जमीन दोस्त झालेली इमारत नव्हती तर शेकडो विद्यार्थ्यांच्या अंधकारमय जीवनात प्रकाशाचा लख्ख किरण आणणारी एक जिवंत व्यक्ती होती. सिकची धर्म शाळेचे रूपांतर सिकची वस्तीगृहात झाले होते आणि हे वस्तीगृह होतकरू गरीब विद्यार्थ्यांचे आधारवड बनले होते. ही वस्तीगृहाच्या संबंधात 15 एप्रिल 2022 च्या एका तुम्ही एक लेख लिहिला होता त्यातला बराचसा भाग पुनर्प्रकाशित करण्याचा मोह आवरत नाही.
एखाद्याच्या हृदयात कणव असेल आणि त्या बरोबरच सामाजिक जाणीवेचा झराही वाहत असेल तर ती व्यक्ती कीती क्रांतिकारी कार्य करू शकतेआणि परमेश्वराने दिलेल्या आपल्या संपत्तीचा समाजासाठी कसा सदुपयोग करू शकते, याचे उदाहरण म्हणजे या वस्तीगृहाचे निर्माते वलगावचे दानशूर गंगाबीसनजी सिकची होत.
शिवाय एवढे करूनही ते कुठेतरी आपले दानशूर म्हणून नाव व्हावे यासाठी यत्किंचितही प्रयत्न करीत नाही ही एक अद्भुत नियती रचना असावी असे वाटते.हा संदर्भ आहे मूळ वलगावचे आणि अमरावतीला स्थायी झालेले दानशूर अॅड्.
गंगाबिसनजी सिकची यांचा . त्यांच्या मातोश्री
रामप्यारीबाई ह्या अतिशय उदार अंतःकरणाच्या, धार्मिक प्रवृत्तीच्या ,सात्विक मनाच्या होत्या.परमेश्वराने त्यांना कुबेराच्या घरी जन्म दिला होता. आपल्या संपत्तीचा काही वाटा हा समाजातील दरिद्री नारायणांच्या पोटापाण्यासाठी खर्च केला पाहिजे, ते आपले कर्तव्यच आहे, मानव सेवा हीच माधव सेवा आहे अशी त्यांचीधारणा होती. या धर्मशाळेत किमान शंभर दरिद्रीनारायणांसाठी रोजउत्तम गरम भोजनाची व्यवस्था असे. दरिद्री नारायणाची पंगत बसत असे लोकांना दररोज मोफत गरमागरम ऊत्तम प्रतीचे जेवण वाढल्या जाई. रामप्यारी बाईंच्या निधनानंतर त्यांचे दानशूर सुपुत्र
गंगाबिसनजी सिकची.
काॅलेज मध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी धर्मशाळा वस्तीगृहात परिवर्तित केली.दर वर्षी 60 विद्यार्थ्यांना मोफत निवासआणि जेवण व्यवस्था या वसतीगृहात केली .महाविद्यालयीन अभ्यासक्रम दोन-तीन वर्षांचा आहे आणि त्यानंतर त्यांना नोकरी मिळू शकतेअशा व्यावसायिक अभ्यासक्रम असलेल्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांना वस्तीगृहात प्रवेश दिल्या जात असे. १९५३मध्ये हे वसतिगृह सुरू झाले.
.गंगाबिसनजी नंतर सुपुत्र अॅड सुरेश बाबू सिकची हे कारभार पहात होते.
.माझे वडील बंधू टी एम जोशी यांनी याच वस्तीगृहात प्रवेश घेऊन सीपीएड पदविका अभ्यासक्रम हनुमान व्यायाम शाळेत प्राचार्य
प्रभाकरराव वैद्य यांच्या हाताखाली पूर्ण केला होता . माझ्या वडिलांनी
गंगाबीसनजी सिकची यांची भेट घेऊन मलाआणि लहान भाऊ मुरलीधर या दोघांना वस्तीगृहात प्रवेश देण्याची विनंती केली. वास्तविक पाहता कला किंवा वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांना प्रवेश नसे.पण माझ्यासारखे काही पाच सातअपवाद होते. रात्री नऊ वाजता वसतिगृहाचा मुख्य बंद दरवाजा बंद होत असे.त्यानंतर कुणालाही प्रवेश नसायचा. रात्री सात वाजता विनोबा रचित ओम तत्सत श्री नारायण तू पुरुषोत्तम गुरु तू .....ही प्रार्थना होत असे. विद्यार्थ्यांची शंभर टक्के उपस्थिती अनिवार्य होती. त्यामुळे रात्रीच्या सिनेमाला जाणे भटकंती करणे शक्य नव्हते. महाविद्यालय आणि आपला अभ्यास या शिवाय काही करता येत नव्हते. वस्तीगृहातच सांस्कृतिक महोत्सवाचा कार्यक्रम होत असे .विद्यार्थी वर्गणी करून तो साजरा करायचे.फोडणीचे वरण आणि पोळी हाच नेहमी चा बेत असायचा. महिन्यातून एकदा गोड-धोड म्हणजे फिस्ट .वस्तीगृहातील प्रवेशानंतर लगेच मला मेस इन्चार्जची जबाबदारी देण्यात आली. मेस मध्ये टाचणी पडली तरी आवाज येईल इतकी शांतता असायची. कोणी आवाज केला तर त्याला दहा पैसे दंड व्हायचा. त्याकाळी(१९६८-६९) दहा पैसे दंड म्हणजे खूप मोठी रक्कम वाटायची. मला दाढी पिढीच्या नारायणदासजी
लढ्ढा ट्रस्टकडून दरमहा दहा रुपये महिना शिष्यवृत्तीमिळायची. त्या दहा रुपये महिन्यात भागत नसे म्हणून विद्यार्थी असतानाच मी बडनेरा रोड वरील भैया इंडस्ट्री जवळील
श्रीमंत राठोड कुटुंबियातील मुलाची(बीएभाग१) शिकवणी घेत होतो. लाल रंगाच्या रॉयल एनफिल्ड बुलेटने तो मला घ्यायला यायचा .त्याच्या घरी जाऊन एक तास त्याला राज्यशास्त्र शिकवायचो. नंतर मला तो वस्तीगृहात सोडून द्यायच बुलेटच्या आवाजाने सारे वस्तीगृह दणाणूनजायचे. बुलेटवर मी ऐटीतजातो हे पाहून अनेकांना आश्चर्य वाटे कारण की माझ्याजवळ तर सायकलही नव्हती.
वस्तीगृहातील खालच्या दोन खोल्यांमध्ये एक सरदारजी राहायचे. सायकल दुरुस्तीचे त्यांचे दुकान होते. धाक आणि दरारा खूप वाटायचा.वसतीगृहाच्या समोरच एक सेवाभावी डॉक्टर होते. विद्यार्थ्यांना ते वैद्यकीय सेवा द्यायचे.
सुरेका उद्योगचे संचालक श्याम सुरेका,आशा सुरेका या कुटुंबाशी माझा अतिशय घनिष्ठ संबंध निर्माण झाला होता. आजही५५ वर्षानंतर तो कायम आहे.
ज्या विद्यार्थ्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत पडत होती त्यांच्या जीवनाचा हे वस्तीगृह
आधारवड होते. आज हा आधारवड धराशयी झाला आहे. वसतीगृहाची इमारत जमीन दोस्त झाली आहे.
.मी शिवाजी कला वाणिज्य महाविद्यालयातून बीए झालो,विदर्भ महाविद्यालयातून नागपूर विद्यापीठाची एम. ए. (राज्यशास्त्र)पदवी मिळवली. यवतमाळला दाते कॉलेजमधून प्राध्यापक म्हणून निवृत्त झालो. शिवाय हिंदुस्थान, तरुण भारत, मतदार, युगधर्म ,लोकसत्ता, नागपुर टाइम्स पत्रकारीता करण्याची संधी मिळाली प्रतिष्ठेच्या दर्पण पुरस्कारापासून बरेच पुरस्कार मिळाले. राज्य मागास आयोगावर सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली राज्याच्या सचिवपदाचा दर्जा आणि थाट काय असतो हेही अनुभवले. अमरावती
विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणावर अनेक वर्ष संधी मिळाली पत्रकारीतेतील दर्पण पुरस्कारापासून सारे पुरस्कार मिळाले.
यवतमाळात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे म्हणून केलेले आंदोलन असो, वक्तृत्व कलोपासक मंडळ असो, सेवा मुक्त केलेल्या प्राध्यापकांची प्रकरणे न्यायाधिकरणा समोर लढण्याचे काम असो हे सारे सिकची हॉस्टेल मुळे शक्य झाले. या होस्टेलच्या ऋणात राहणे यातच जीवनाची सार्थकता मानतो.
पीएच. डी. साठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तुटपुंज्या शिष्यवृत्तीच्या भरवशावर socio Political thought of Dada Saheb khapardeया विषयावर दिल्लीतील संसदेच्या ग्रंथालयात आणि नॅशनल आर्काइव्हज ऑफ इंडिया मध्ये संशोधन करू लागलो. प्राध्यापक बी टी देशमुख, प सी काणे,पीएच डी चे
गाईड प्रा. श्री गो काशीकर ,प्रा डॉ टी डी मुदलियार प.ल.जोशी भा .ल .भोळे ,एन. आ.र देशपांडे, र. वी.रानडे यासारख्या प्राध्यापकांचा सहवास आणि मार्गदर्शन लाभले.
वसतिगृहात असताना मी मोठ मोठ्या नामवंत वक्त्यांची व्याख्याने आयोजित करीत होतो प्राध्यापक श्री. गो. काशीकर ,वा. सी . काळे, सुरेश भट ,प.सि काणे यांच्यापासून तर अनेक साहित्यिक कवी लेखक यांच्या व्याख्यानांचे आयोजन करीत असे. एक किस्सा आठवतो . एका नाटकात लहान भाऊ स्त्री पात्र करायचे होते .ऐनवेळी मिशा काढणार नाही म्हणून तो अडून बसला.वडील जिवंत असतांना मिशा काढायचा नाही अशी त्याची धारणा.अखेर मिशा न काढता मेकअप करून मिशीधारी महिलेचा रोल त्याने केला आणि प्रेक्षकांची
हसता हसता पुरेवाट झाली. सिकची होस्टेल आता बंद झाले आहे. मात्र या हॉस्टेल मुळेच शेकडो विद्यार्थ्यांचे जीवन सोन्यापरी झाले. हॉस्टेल नसते तर आयुष्याची तर माती झाली असती. वसतीगृहाच्या काही माझी विद्यार्थ्यांनी समाज माध्यमांवर एक ग्रुप तयार केला आहे त्यामुळे स्मृतीची काही पाने चाळता येतात.
हृदयात करुणा जपत करता येईल तेवढी सेवा करा हा संदेश या वस्तीगृहाने दिला आहे. शेकडो विद्यार्थ्यांचा आधारवड धराशयी पडला आहे .विनम्र श्रद्धांजली.
__********_____
प्रा.न. मा. जोशी, यवतमाळ.
८८०५९४८९५१
No comments